वराडकर हायस्कूल कट्टा येथे रानभाजी प्रदर्शन, विक्री व पाककला स्पर्धा संपन्न
मालवण | प्रतिनिधी : : शालेय शिक्षण विभागाच्या वतीने सर्व शाळांमध्ये आनंददायी शनिवार हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे रानभाजी पाककला स्पर्धा, प्रदर्शन व विक्री हा उपक्रम प्रशालेतील स्काऊट गाईड विभाग व राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आला.
पावसाळ्यात कोकणात विविध प्रकारच्या रानभाज्या पाहायला मिळतात. अगदी माळरानावर, शेताच्या कडेने, घराच्या बाजूला विविध रानभाज्या नैसर्गिक रित्या उगवतात व सहज उपलब्ध होतात. यात अळू, पेवगा, टाकळा, फोडशी, घोटवेल, एक पानाची भाजी, शेवगा, करटोली, कुर्डू, कुड्याच्या शेंगा, सुरण , चवयीची केळफुले, मावशीची भाजी अशा विविध प्रकारच्या भाज्या आपल्या परिसरात सापडतात.
परंतु अलीकडच्या फास्टफूडच्या जमान्यात आजची पिढी या नैसर्गिकरित्या मिळणाऱ्या, कोणतीही रासायनिक फवारणी नसलेल्या रानभाज्यांना विसरत चाललेली आहे. या रानभाज्यांचे आपल्या निरोगी आरोग्यासाठी फार महत्त्व आहे. विद्यार्थ्यांना या रानभाज्यांची ओळख व्हावी, रानभाज्यांपासून चविष्ट पदार्थ तयार केले जाऊ शकतात , तसेच मुलांना श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व समजावे,यासाठी या रानभाज्या स्पर्धा, प्रदर्शन व विक्री या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमात इयत्ता पाचवी ते नववीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. रानभाज्यांपासून उत्कृष्ट पाककृती विद्यार्थ्यांनी घरून बनवून आणल्या, यात अळूवडी, कुर्डूची वडी, टाकळ्याची भाजी , कुड्याच्या शेंगांची भाजी, अशा विविध पदार्थांचा समावेश होता.
या स्पर्धेचे परीक्षण प्रशालेतील शिक्षक श्री महेश भाट, व शिक्षिका सौ समिक्षा दळवी यांनी परीक्षण केले.
या उपक्रमासाठी श्री समीर चांदरकर, श्री बाळकृष्ण वाजंत्री, सौ सिमरन चांदरकर, श्री प्रकाश कानूरकर,सौ विणा शिरोडकर, श्री भूषण गावडे, श्री एकनाथ राऊळ यांचे सहकार्य लाभले.
यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ देवयानी गावडे यांनी विद्यार्थ्यांना रानभाजीचे महत्त्व सांगितले.
या उपक्रमासाठी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री अजयराज वराडकर व सर्व संचालक मंडळ यांनी शुभेच्छा दिल्या.

