मराठी भाषा अभिजात बनली म्हणजे काय झाले हे प्रत्येकाला माहित असणे आवश्यक साहित्यिका मेघना जोशी यांचे प्रतिपादन
जुबेर खान । मालवण : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठीच्या विकास आणि प्रसारासाठी आर्थिक तरतुदीसह अनेक महत्त्वाचे उपक्रम राबवले जाणार आहेत, असे प्रतिपादन मालवणच्या साहित्यिका आणि करिअर कॉन्सिल सेंटर मालवणच्या संचालिका सौ. मेघना जोशी यांनी केले. मराठी भाषा अभिजात बनली म्हणजे नेमके काय झाले, हे प्रत्येकाला माहीत असणे गरजेचे आहे. याचा फायदा आपण कसा घेऊ शकतो किंवा मराठी भाषेसाठी आपण काय योगदान देऊ शकतो, याचा विचार प्रत्येकाने करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
भंडारी ए सो हायस्कूल, मालवण येथे अभिजात मराठी भाषा दिन आणि अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने मंगळवार, दिनांक ७ ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ग्रंथालय विभागाच्या वतीने 'अभिजात मराठी भाषा आणि आपण' या विषयावर सौ. मेघना जोशी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्यासपीठावर मुख्याध्यापक एच. बी. तिवले, पर्यवेक्षक आर. डी. बनसोडे, सौ. संजना सारंग, सौ. सरोज बांदेकर आणि ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. सौ. जोशी यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. प्रारंभी श्री. प्रफुल्ल देसाई यांनी प्रास्ताविक केले, तर श्री. तिवले यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

केंद्र शासनाकडून २५० ते ३०० कोटींचे अनुदान आणि भव्य योजना
आपल्या व्याख्यानात बोलताना सौ. मेघना जोशी यांनी अभिजात भाषेच्या दर्जामुळे मराठीसाठी उपलब्ध झालेल्या अमूल्य संधींवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे केंद्र शासनाकडून २५० ते ३०० कोटी रुपयांचे मोठे अनुदान दिले जाणार आहे. या अनुदानातून अनेक आर्थिक तरतुदी केल्या जातील. यामध्ये मराठी ग्रंथ व साहित्याचा मोठ्या प्रमाणावर प्रसार करणे, गुणवत्तापूर्ण शिक्षणात मराठीचा समावेश करणे यांसारख्या बाबींचा समावेश आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, विद्यार्थ्यांना मराठीचा अभ्यास करण्यासाठी प्रत्येक विद्यापीठात स्वतंत्र केंद्र निर्माण होणार आहे. ग्रामीण आणि शहरी भाग मिळून सुमारे ४५० केंद्रे उभारली जातील. तसेच, मराठी भाषेतील दोन विद्वान किंवा साहित्यिकांना राष्ट्रीय पुरस्कार दिला जाईल. हे सर्व उपक्रम आपल्या भावी पिढीसाठी आणि मराठीच्या उज्वल भविष्यासाठी केले जात असल्याने, मराठी भाषा अभिजात झाल्याने काय घडणार आहे आणि मराठीसाठी कोणत्या तरतुदी केल्या जाणार आहेत, याची माहिती आपण सर्वांनी करून घेतली पाहिजे, असे मत सौ. जोशी यांनी मांडले.
मातृभाषेचा सन्मान राखा : 'मिश्र भाषा' बोलणे टाळा
यावेळी सौ. जोशी यांनी मराठी भाषेच्या वापरासंबंधी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. त्या म्हणाल्या, आजकाल अनेकजण मराठी बोलताना त्यात इतर भाषांचे शब्द मिसळून बोलतात. असे न करता, आपण आपली मातृभाषा चांगल्या पद्धतीने बोलली पाहिजे. आपल्याला अनेक भाषा येणे उत्तम आहे, पण आपली मातृभाषा असलेल्या मराठीची लाज बाळगता कामा नये.त्यांनी पुढे स्पष्ट केले की, जो माणूस मातृभाषेतून चांगल्या रीतीने विचार करू शकतो आणि व्यक्त होऊ शकतो, तो माणूस आपोआपच इतर भाषांमध्येही चांगल्या पद्धतीने विचार करून आपले म्हणणे मांडू शकतो. त्यामुळे, आपण आपली भाषा एकसंध बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि इतर भाषा मिसळून मराठी बोलणे टाळले पाहिजे, असे आवाहन सौ. जोशी यांनी केले. शेवटी, पर्यवेक्षक आर. डी. बनसोडे यांनी उपस्थित सर्व मान्यवर आणि श्रोत्यांचे आभार मानले. मराठी भाषेला मिळालेल्या या महत्त्वाच्या दर्जामुळे भाषेच्या विकासाला नवी गती मिळेल आणि प्रत्येक मराठी भाषकाने आपल्या भाषेच्या समृद्धीसाठी योगदान द्यावे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

