हिंदू - ख्रिश्चन एक समानतेचा संदेश देणारा सोहळा
तीन दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
जुबेर खान | मालवण : मालवण शहरातील गावंडीवाडा येथील श्री गणेश येशु मंदिराचा २२ वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. श्री गणेश आणि येशू या दैवतांचा संगम असणाऱ्या या मंदिराचा वर्धापन दिन सोहळा म्हणजे धार्मिक सलोख्याचे आणि एकोप्याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. या निमित्ताने मंडळाच्या वतीने १४ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष भावेश बटाव, उपाध्यक्ष बादल फर्नांडिस आणि कार्याध्यक्ष संचित देसाई यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे स्वरूप :
दिनांक १४ ऑक्टोबर रोजी सोहळ्याची सुरुवात होईल. या दिवशी लघुरुद्राचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १५ ऑक्टोबर रोजी धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ७ वाजता संगीत भजनाचा कार्यक्रम, यानंतर, रात्री ८ वाजता येशू पूजा (तेस) पार पडेल. या सोहळ्या निमित्त १६ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजता काकड आरती, दुपारी १ वाजता ब्राह्मण भोजन आयोजित करण्यात आले आहे. या तीन दिवसीय होणाऱ्या कार्यक्रमासाठी गावंडीवाडा, येथील येशू गणेश भक्त मंडळ सज्ज झाले आहे. भाविकांनी या तीन दिवसीय होणाऱ्या धार्मिक सोहळ्यात सहभागी होऊन कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

