संजय माने : मालवण तालुक्यातील श्री शांतादुर्गा सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ वडाचा पाट पाटकर वाडी आयोजित केलेल्या नवरात्र उत्सवात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळी सुरू असुन यामध्ये दररोज दुर्गा देवीची पूजा आरती, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी देवीची आरती, ग्रामस्थांची सुस्वर भजने, त्या नंतर गरबा दांडीया नृत्य सादर केले जातात या मुळे गावातील वातावरण आनंदी व प्रसन्न झाले आहे.

या नवरात्र उत्सवाला ३४ वर्षांची परंपरा लाभली असून नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती आहे. वडाचा पाट पाटकर वाडी येथील जगदिश पाटकर आणि बंधु यांच्या वतीने दरवर्षी दुर्गा देवीची नयनरम्य मूर्ती साकारली जाते या वर्षी सुध्दा अतिशय सुंदर, विलोभनीय व डोळ्यांचे पारणे फेडणारी भव्य व प्रसन्न मूर्ती साकारली आहे. आकर्षक विद्युत रोषणाई, भव्य मंडप, साऊंड सिस्टीम व भाविक भक्तांची गर्दी यामुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.या नवरात्र उतसवाबाबत माहिती देताना पाटकर बंधु म्हणाले की मध्यंतरी हा उत्सव बंद करण्याचे ठरविले होते परंतु त्याच दिवशी सकाळी एका देवी भक्ताच्या विहीरीत वाघ पडला हे अघटीत घडल्याने आपण सर्वांनी हा नवरात्र उत्सव बंद करीत असल्यानें कदाचित हा देवीने दिलेला संकेत असु शकतो म्हणून मग सर्वांनी धावपळ करून देवीची मूर्ती, सर्व सजावट वगैरे करून रात्री ११ वाजता देवीची पूजा आरती केली व देवीला शरण गेलो. तेव्हा पासून आज ३४ वर्ष नुकताच थाटामाटात व धुमधडाक्यात हा नवरात्र उत्सव साजरा केला जातो.

