सिंधुदुर्गातील प्रतिभासंपन्न 'युवारत्न'
💐 नवदुर्गा : पुष्प सहावे 💐

कु. परी दिनेश खवळे
🖋️ स्काय न्युज टुडे | मंगेश नलावडे : प्रत्येक स्त्री रुपात देवी आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र देवी नवदुर्गा रुपांचा उत्सव-जागर होत असताना स्त्री शक्तीला आदरयुक्त प्रणाम..! देवीच्या उत्सवाच्या निमित्ताने 'स्काय न्यूज टुडे' वेब टीमच्या माध्यमातून 'नवदुर्गा' या सदरातून स्त्री शक्तींच्या प्रतिभासंपन्न कार्यकर्तृत्वाला प्रणाम….!
आज असं कोणतंच क्षेत्र राहिलेलं नाही कि ज्यामध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिला नाहीत. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे, करत आहेत. कला क्षेत्रातही स्त्री शक्तीने आपले विशेष स्थान निर्माण केले आहे.

आपली कोकणची धार्मिक परंपरा आणि संस्कृती जपत समाजातील दुर्बल घटकांच्या सेवेसाठी लढायचं आहे. शिक्षण क्षेत्रात कायदेविषयक ज्ञान संपादन करून नारी शक्तीचा ठसा ठळकपणे उमटवायचा आहे. असे धेय्य घेऊन वाटचाल करणाऱ्या देवगड तारामुंबरी गावच्या सुकन्या युवा भजनरत्न कु. परी दिनेश खवळे या होय.
देवगड तालुक्यातील तारामुंबरी गावतील १७ वर्षीय कु.परी खवळे आपल्या भजन गायनाने छाप उमटवीत आहेत. सोबत उकृष्ट अभिनय, कला, क्रीडा क्षेत्रात तसेच सामाजीक कार्यातही त्यांचे योगदान आहे. ओरोस येथील डॉन बॉस्को हायस्कुल अँड ज्युनियर कॉलेज येथे अकरावी कॉमर्स शाखेत त्या शिक्षण घेत आहेत.
कु. परी हिचे वडील ओरोस येथे शासकीय सेवेत आहेत. त्यामुळे परी हिचा शैक्षणिक प्रवास ओरोस डॉन बॉस्को येथे. इयत्ता सातवीत असल्या पासून भजन सेवेला त्यांनी सुरवात केली. भजन क्षेत्रात गुरु आदरणीय सुंदर मेस्त्री यांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.

परी सांगतात नववीत असताना आमच्या इंग्रजी माध्यम शाळेत शिकणाऱ्या मुलींनी मिळून आम्ही ठरवलं की आपल्या गावात भजन संस्कृती जोपासायची. आणि त्यातूनच "श्री रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ, ओरोस” या भजन मंडळाची स्थापना झाली. आम्हा सर्वांना भजनाची ओढ वाढत गेली. नववी आणि दहावीच्या काळात आम्ही भजन केले आणि त्यातून समाजात भजन संस्कृती जिवंत ठेवली. माझ्या घरात भक्ती भावाची भजन परंपरा असल्याने लहानपणी पासूनच भजनाचा नाद कानी ऐकू येत होता. त्यातूनच हळूहळू भजना बद्दल कुतूहल निर्माण झालं आणि नंतर प्रामाणिकपणे सराव करत मी स्वतःला या क्षेत्रात झोकून दिलं. हार्मोनियम, पखवाज यासारख्या वाद्यांची ओळख झाली आणि भजन मंडळांतून देवाचे नामस्मरण करत लोकांपर्यंत भक्तीचा संदेश पोहोचवण्याची प्रेरणा मिळाली. आत्मविश्वास, संस्कर, बोलकेपणा आणि जनमाणसात निर्भीडपणे उभं राहण्याच धाडस भजन क्षेत्रातून मिळते. भजन सेवेतुन परमेश्वराशी समरस होता येत.
शालेय जीवनात नववीत असताना डिसेंबर महिन्यात डॉन बॉस्को तर्फे आयोजित "बॉस्कोरी कॅम्प गुवाहाटी आसाम" मध्ये मला सहभागी होता आलं. तिथे मी मालवणी गाऱ्हाणं सादर केलं. आपल्या दशावतारी परंपरेचं दर्शन घडवलं आणि संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांसमोर आपली कोकणच्या कला संस्कृतीचे दर्शन घडविले. माझ्या या कलेला राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला. त्या अनुभवातून मला आत्मविश्वास, अभिमान आणि इतर राज्यांतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची संधी मिळाली. अभिनयाची आवड असल्याने मी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभाग घेतला आहे.

स्काऊट गाईड राज्य पुरस्कार – २०२४ चा राज्य पुरस्कार मिळवणारी एकमेव विद्यार्थिनी असल्याचा मला विशेष अभिमान आहे.या पुरस्कारासाठी थिअरी आणि प्रात्यक्षिक या दोन्ही परीक्षांमध्ये यश मिळवलं. स्काऊट गाईड मधून ही एक परीक्षा असते. दहावीत असताना मी ह्या स्पर्धेत भाग घेतला व मला राज्य पुरस्कार प्राप्त झाला. क्रीडा क्षेत्रात विभागीय स्तरावर फुटबॉल, कबड्डी आणि वेटलिफ्टिंग मध्येही सहभाग घेतला. दहावी मध्ये ९४.२०% गुण मिळवून यश संपादन केले. आता मी अकरावी कॉमर्स शाखेत डॉन बॉस्को हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ओरोस येथे शिक्षण घेत आहे.
भविष्यात कायदेविषयक शिक्षण घेऊन उत्तम वकील होण्याचे माझं स्वप्न आहे. कायद्याच्या क्षेत्रात उत्कृष्ट वकील होऊन मी फक्त स्वतःसाठी नाही, तर समाजातील प्रत्येक दुर्बल, स्त्री आणि न्यायाच्या शोधात असलेल्या लोकांसाठी उभं राहणार आहे. शिक्षण, कला आणि सामाजिक,. संस्कृतीक सेवा करून समाजात सकारात्मक बदल घडवणार आहे. माझं उद्दिष्ट फक्त करिअर नाही, तर न्याय, कला आणि नारी शक्तीचा ठसा ठळकपणे समाजात उमठवायचा आहे. असे कु. परी खवळे या सांगतात.



कु.परी खवळे यांना सामाजिक संस्कृतीक कार्याची मोठी आवड असून देवगड तारामुंबरी येथील खवळे महागणपती बाप्पाच्या सोहळ्यात रक्तदान शिबिर आयोजित करून १०३ रक्तदात्यांना रक्तदान करण्यास त्यांनी प्रोत्साहित केलं.
त्या शिक्षण घेत असलेल्या ओरोस येथील जिल्हाधिकरी कॉलनी ते डॉन बॉस्को स्कूल या रस्त्याचं काम सुरू व्हावं म्हणून जिल्हाधिकारी भेट घेतली व सतत पाठपुरावा केला. काम पूर्ण झाल्यावर जिल्हाधिकारी यांच्याकडून शाबासकीची थाप मिळाली. हे प्रोत्साहन देणारे ठरले.



सामाजिक कार्य, भजन संस्कृती जोपासत ठेवून मला माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे. भजन आणि शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून संस्कृती आणि भक्तीची सेवा चालू ठेवणार आहे. नवरात्रीच्या पावन पर्वात, नवदुर्गेच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात अनंत ऊर्जा, सामर्थ्य, शौर्य आणि विजयी उत्साह नांदो. मातृशक्तीच्या तेजोमय प्रकाशात तुमच्या प्रत्येक प्रयत्नांना यश, तुमच्या मनोकामनांची पूर्णता होवो. या पवित्र पर्वात प्रत्येक क्षणात नारीशक्तीचा अभिमान जिवंत राहो. असे त्या सांगतात.
सिंधुदुर्गच्या मातीतील प्रतिभासंपन्न युवारत्न कु. परी दिनेश खवळे यांच्या पुढील वाटचालीसाठी स्काय न्यूज टुडे परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा….!
▪️अमित खोत | मालवण, सिंधुदुर्ग

