भजन-डबलबारी क्षेत्रातील कलारत्न
💐 नवदुर्गा : पुष्प चौथे 💐

कु. रिया राजेश मेस्त्री
🖋️ स्काय न्युज टुडे | मंगेश नलावडे : प्रत्येक स्त्री रुपात देवी आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र देवी नवदुर्गा रुपांचा उत्सव-जागर होत असताना स्त्री शक्तीला आदरयुक्त प्रणाम..! देवीच्या उत्सवाच्या निमित्ताने 'स्काय न्यूज टुडे' वेब टीमच्या माध्यमातून 'नवदुर्गा' या सदरातून स्त्री शक्तींच्या प्रतिभासंपन्न कार्यकर्तृत्वाला प्रणाम….!
आज असं कोणतंच क्षेत्र राहिलेलं नाही कि ज्यामध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिला नाहीत. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे, करत आहेत. कला क्षेत्रातही महिला कलावंत यांनी आपले विशेष स्थान निर्माण केले आहे.

भजन डबलबारी क्षेत्रात आपला ठसा ठळकपणे उमटवणाऱ्या कणकवली फोंडाघाट लोरे नं. १ नरामवाडी येथील कु. रिया राजेश मेस्त्री या होय. वडिलांच्या इच्छेनुसार कलेची सेवा करतं त्यांनी या क्षेत्रात आपले स्थान ठळकपणे निर्माण केले. डबलबारी भजन क्षेत्रात महिला भजन बुवा सोबत पुरुष भजनी बुवां सोबत ही डबलबारी चे सामने करून अल्पवाधितच त्यांनी आपली ओळख निर्माण केली.
भजन बारी क्षेत्रात हजर जबाबीपणा आणि उत्कृष्ट भजन गायन शैली त्यांच्याकडे आहे. भविष्यात भजन क्षेत्रातील शास्त्रोक्त गायनाचे शिक्षण घेऊन संगीत क्षेत्रातील पदवी आणि संगीत विशारद पदवी मिळवायची आहे असे कु. रिया मेस्त्री सांगतात.
रिया मेस्त्री यांचा जन्म कणकवली तालुक्यातील नरामवाडी येथे झाला. ९ वी पर्यंतचे शिक्षण मुंबईला झाले. दरम्यान कोरोना काळात बिकट परिस्थिति मुळे आई वडिलांनी मुंबई सोडायचा निर्णय घेतला आणि मूळगावी परतले. रिया यांचे पुढील शिक्षण घोणसरीतील अ. वी. फडणीस माध्यमिक विद्यामंदिर तसेच न्यू इंग्लिश स्कूल जुनिअर कॉलेज ऑफ फोडाघाट येथे 11, वी 12 वी शिक्षण पुर्ण करून आता फोडाघाट एज्युकेशन सोसायटी आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज याठिकाणी बी.ए. शेवटच्या वर्षाला शिकत आहे.
रिया भजन क्षेत्राच्या सुरुवात बद्दल सांगतात, स्वप्नात ही नाही होत की या भजन क्षेत्रात आपण यश मिळवू शकतो. अपघाताने मी या क्षेत्रात आली. वडील भजनी बुवा असल्याने घरात जन्मापासूनच भजन होते. पण कधी आपण भजन करावं किंवा भजन क्षेत्राबद्दल फारस काही कुतूहल नव्हतं. वडिलांचं स्वप्न होत की आपली मूल सुद्धा भजन क्षेत्रात असावी आणि त्यांनी सुद्धा यातील शिक्षण घ्याव. एक दिवशी आमच्या गावाच्या मंदिराचा जीर्णोद्धार असताना इतर भजन मंडळ भजन करत होती काही कारणांनी वडीलांना इच्छा असून तिथे भजन नामस्मरण करता येत नव्हते. त्यामुळे ते खूप अस्वस्थ झाले आणि तेव्हाच त्यांनी ठरवलं की आपल्या मुलांमध्ये भजन उभं करायचं. त्यांनी आम्हाला हार्मोनियम, पखवाज, चकवा, असे सगळे साहित्य शिकवायला सुरवात केली. आमची मेहनत चालू झाली. रोज नित्य नियमाने पोथी-पुराने वचन, पौराणिक कथा आकलन, आध्यात्मिक संदर्भाचा अभ्यास अस सगळ चालू झालं आणि मग कॉलेज मधील काही मैत्रिणी ना साथी ला घेऊन "श्री स्वामी समर्थ नवतरुणी भजन मंडळ" हे स्थापन केलं. भजन क्षेत्रात सुरवात केलं. माझे वडील श्री राजेश मेस्त्री हेच माझे पहिले गुरू. त्यानंतर सुप्रसिद्ध भजनी बुवा सुंदर मेस्त्री यांच्या कडे गायनाचे धडे घेण्यास सुरवात केली, गायनातील काही शास्त्रयुक्त गोष्टी त्यांच्या कडून शिकले.



मला गायनाची आवड लागली आणि त्यात भजनी बुवांना मिळणारा सन्मान आणि भजनाना मिळणारा प्रतिसाद याचा आनंद वाटू लागला. माझ्या स्वभावा मध्ये बोलकेपण ओळखून मला डबलबारीची संधी आली आणि पुढील वाटचाल सुरु झाली.
माझी बतावणी आणि आवाज प्रेक्षकांना आकर्षित करू लागला आणि त्यामुळे मला अजून भजन क्षेत्रात जास्त संधी मिळत गेली.
एका अभंगवाणी च्या कार्यक्रमा दरम्यान मला पुरुष बुवा विरुद्ध डबलबारी करायची संधी मिळाली. वडिलांनी ते चेलेंज स्वीकारलं. मुळात माझा स्वभाव अतिशय स्पष्टपणे आपले मत मांडणारा आहे. थोडा रागीट असल्याने मला डबलबरी मध्ये संयम ठेवावा लागतो. निर्भीडपणे पुरुष प्रधान भजनी बुवां सोबत डबल बारी सामने करायला सुरुवात केली. भजन क्षेत्रात स्त्रिया सुद्धा मागे नाहीत हे सिद्ध करायचं प्रयत्न केला. मला माहित होतं की महिला विरुद्ध पुरुष बारी मध्ये काहीवेळा महिलेला दोष दिला जातो. बतावणी आणि विनोद जर पुरुषांनी केली तर ते योग्य आणि महिलेने केलं तर ते चुकीचे अशी काहीशी आपल्या समाजा मध्ये समज आहे. तरीही मी वडिलांच्या इच्छेसाठी आणि स्वतःच अस्तित्व सिद्ध करण्यासाठी हे धनुष्य पेलायच ठरवलं. समाजा मध्ये संदेश जाईल की स्त्री कुठेच मागे नाही. पुढची पिढी आदर्श घेऊन स्वतःला निर्भीडपणे प्रत्येक क्षेत्रात उतरवतील. नामवंत बुवां सोबत भजन बारी करायची संधी मिळाली. त्यांच्या कडून बरच काही शिकायला मिळात आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई इत्यादी जिल्ह्यामध्ये प्रचंड गर्दीने हाऊस फुल असे डबलबरीचे सामने आणि लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद मला लाभला.

सुरुवातीला भजन केलं तर याक्षेत्रात आवड निर्माण झाली, आणि नंतर मला डबलबारी मधून खूप प्रसिद्धी मिळाली. खूप लोकांनी माझ्या कलेच खूप कौतुक केलं. काहीवेळा टीका सुद्धा झाली. लोक तर देवाला सुद्धा नाव ठेवतात. त्यात मी काय माणूसच आहे. आणि पुरुषांना त्यांच्या भाषेत उत्तर मिळणार तर त्यांचा इगो दुखावणारच ना? सोशल मीडिया वरती खूप भजन व्हायरल झाली
आई ने मला सल्ला दिला की कौतुक करणारे हजारो आहेत त्यांचा विचार कर. अजून सुधारणा कर आणि भजन करत रहा. या मध्ये वेळोवेळी विनोद चव्हाण बुवांच मार्गदर्शन असत आणि गुंडू सावंत यांनी कठीण काळात कणखरपणे पाठीशी उभे राहिले, या क्षेत्रात आल्यावर मला अंकिता गावडे आणि साची मुळम यांसारखे जिवाभावाचे मैत्रिणी मिळाल्या. या क्षेत्राने मला ओळख दिली, खूप अनुभव मिळाले, नामांकित बुवां कडून आशीर्वाद आणि कौतुकाची थाप मिळाली, यातून माझ्या आणि माझ्या वडिलांच्या डोळ्यातील स्वप्न पूर्ण झाल्याचे समाधान मिळालं.


रिया सांगतात स्वतःच एक वेगळा अस्तित्व बनवायचं आहे. त्यासाठी शास्त्रशुद्ध गायनाच शिक्षण घ्यायचं आहे, विशारद किंवा अजून ज्या संगीत क्षेत्रातील पदवी आहेत त्या मिळवायच्या आहेत. शास्त्रीय संगीत क्षेत्रात जोमाने उतरायचे आहे.
समाजातील स्त्रीयांना सांगायच आहे की, कधीही मागे हटू नका, शिका आणि शिकत रहा. टिका, बोलणे हे समजात असते सोबत कौतुक सन्मान करणारेही अनेक असतात. नवदुर्गा माता, सरस्वती माता तुमच्या मागे नेहमीच राहील. स्वतःचे क्षेत्र निवडा तुम्ही स्वतःला सिद्ध करा. यशस्वी व्हा असेही रिया मेस्त्री सांगतात.
रिया मेस्त्री यांच्या पुढील वाटचालीसाठी तिला स्काय न्यूज टुडे परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा….!
▪️अमित खोत | मालवण, सिंधुदुर्ग

