तीन संघ जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी पात्र
जुबेर खान | : वराडकर हायस्कूल,कट्टा येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल, मालवणच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत तीन गटांमध्ये विजेतेपद पटकावले आहे. त्यांच्या या यशामुळे तिन्ही संघ आता जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत मालवण तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.विद्यार्थ्यांच्या यशा बद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.
या स्पर्धेत जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलच्या १४ वर्षां खालील मुले, १४ वर्षां खालील मुली आणि १७ वर्षां खालील मुली या तिन्ही संघांनी अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी संघांवर मात करत प्रथम क्रमांक मिळवला. खेळाडूंच्या या चमकदार कामगिरीचे कौतुक होत आहे.
सर्व यशस्वी संघांना क्रीडा शिक्षक निशाकांत पराडकर, पंकज राणे तसेच कबड्डी प्रशिक्षक नितीन हडकर आणि दीपक जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे खेळाडूनी हे यश संपादन केले.
या खेळाडूंच्या या दैदिप्यमान यशाबद्दल मालवण एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. वेंगुर्लेकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सर्व संघांना शुभेच्छा दिल्या, या खेळाडूंच्या विजयाने जय गणेश स्कूलने क्रीडा क्षेत्रात प्रगतीची चुणूक दाखवून दिली आहे.

