संजय माने | पोईप : मालवण तालुक्यातील मसुरे आर.पी बागवे हायस्कूल येथे कॉज टू कनेक्ट फाउंडेशन पुणे मार्फत बहुविध कौशल्य अभ्यासक्रमांतर्गत सन २०२३ ते सन २०२५ या कालावधीतील अभ्यासक्रम परिपूर्ण प्रमाणपत्र वितरणाच्या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमावेळी फाउंडेशनचे सिंधुदुर्ग प्रकल्प समन्वयक श्री सुचित भोगले, संस्थेचे सभासद संतोष अपराज, प्रशालेच्या मुख्याध्यापीक सौ. अर्चना कोदे , शिक्षिका सौ. आरती मसुरेकर, एस व्हि. पिंगुळकर, शाळा समन्वयक श्री रमेश पाताडे, तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते.

यावेळी बोलताना सूचित भोगले यांनी विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाबरोबरच, बहुविध कौशल्य अभ्यासक्रमाद्वारे गृहपयोगी उपकरणांची गरज,हाताळणी आणि दुरुस्ती तसेच भविष्यात यातून मिळणारे आर्थिक फायदे याचे महत्व पटवून दिले. दरम्यान मुख्याध्यापिका अर्चना कोदे आणि रमेश पाताडे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थांना कौशल्य शिक्षणाबद्दल मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
कॉज टू कनेक्ट फाउंडेशन पुणे या संस्थेचा बहुविध कौशल्य हा अभ्यासक्रम गेली दोन वर्षे आर.पी.बागवे हायस्कूल मध्ये सुरू करण्यात आला असून त्याचे फायदे विद्यार्थ्यांना होताना दिसत आहेत. या अभ्यासक्रमामध्ये (एम एस एफ सी) बागकाम, शेती तंत्रज्ञान, उर्जा आणि पर्यावरण, अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान, कार्यशाळा व अभियांत्रिकी तंत्रज्ञान यासारख्या विविध कौशल्य प्रशिक्षणाचा समावेश आहे.
हा कार्यक्रम विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रमाची प्रस्तावना पाताडे यांनी केली तर आभार मसुरेकर यांनी मानले.


