भर पावसात क्रिकेट स्पर्धेचा अनोखा आनंद
जुबेर खान | मालवण : रुपेश करलकर आणि उमेश चव्हाण मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'एक गाव एक संघ' पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा आज, ३ जुलै रोजी रेवताळे मालवणमध्ये शानदार शुभारंभ झाला. हरी खोबरेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली, भर पावसात रंगलेल्या या स्पर्धेमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही स्पर्धा ३ जुलै ते ६ जुलै दरम्यान खेळवली जात असून, यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध संघांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी हरी खोबरेकर, मनोज मोंडकर, बाबी जोगी, उमेश मांजरेकर, चिंतामणी मयेकर, दत्ता पाईपकर, उमेश चव्हाण, रुपेश करलकर, बंड्या सरमगकर, अमय मांजरेकर, सुनील मालवणकर, टेनिस फर्नांडिस, पिंट्या पार्ट, एमरोस अलमेडा, विशाल लुडबे यांसारखे अनेक क्रिकेटप्रेमी आणि मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेतील विजेत्या संघाला २५,०००/- रुपये रोख रक्कम आणि आकर्षक चषक प्रदान करण्यात येणार आहे, तर उपविजेत्या संघाला १५,०००/- रुपये आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येईल. संघांच्या यशासोबतच वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही प्रोत्साहन देण्यासाठी विशेष पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. यामध्ये उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीर यांना आकर्षक चषक देऊन सन्मानित केले जाईल.
या स्पर्धेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, सर्व सामने 'SKY NEWS TODAY' या YouTube चॅनलवर थेट प्रक्षेपित केले जात आहेत. त्यामुळे जे प्रेक्षक मैदानावर उपस्थित राहू शकत नाहीत, त्यांनाही घरबसल्या या रोमांचक सामन्यांचा आनंद घेता येणार आहे.
या स्पर्धेबद्दल अधिक माहितीसाठी किंवा प्रवेशिकेसाठी इच्छुक संघ आणि खेळाडूंनी पायस अल्मेडा (९३०७९१५१४१) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या स्पर्धेमुळे स्थानिक क्रिकेटला चालना मिळेल आणि नवोदित खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा आहे.

