भाऊ भोगले / बागायत : कातवड येथील प्राचीन असलेले गवळदेवाचे भलेमोठे वडाचे झाड कोसळून जमीनदोस्त झाले आहे. महत्वाची बाब म्हणजे हे झाड खोडाच्या मधोमध समान दोन भागात विभागून पडले आहे.येथील स्थानिक ग्रामस्थांनी तसेच प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली कारण या झाडाच्या सावलीचा सर्वांनाच मोठा फायदा होत होता.
कातवड येथील या वडाच्या झाडाला फार मोठे महत्व होते.पूर्वी म्हणजेच गाड्यांची सोय नव्हती तेव्हा सर्व लोक मालवण शहरात जाण्यासाठी पायी प्रवास करायचे आणि त्यावेळेस कातवड ते आडारी पर्यंत संपूर्ण कातळाचा माळ होता आणि या माळावर ऊन वारा पाऊस यांच्यापासून बचाव करण्यासाठी फक्त हेच एक वडाचे झाड सर्वांना सावली देत होते तसेच चहूबाजूच्या गावातील गुराख्यांना या वडाच्या झाडाचा आधार मिळत होता आणि म्हणूनच या झाडाला जास्त महत्व होते देव दीपावलीच्या वेळी येथे गवळदेव साजरा केला जातो ,तर वटपौर्णिमेला आजूबाजूच्या महिला वडाची पूजा करण्यासाठी मोठ्या संख्येने येत होती.
आता मात्र येथे मोठ्या प्रमाणात वस्ती झाल्यामुळे लोकांना या वडाची तेवढी गरज भासत नव्हती .मात्र दुरून आलेले प्रवासी तसेच स्थानिक उन्हाळ्याच्या दिवसात या झाडाखाली सावली व शुद्ध हवा घेण्यासाठी थांबत असत. मात्र हा वड पूर्णपणे कोसळून गेल्याने सर्वांनाच त्याची उणीव भासत आहे. आणि नवीन युगात हे या माळावर एकमेव प्राचीन झाड होते असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

झाडाचे झाले दोन भाग | कातवड येथील गवळदेवाचे प्राचीन वडाचे झाड कोसळले
