भाऊ भोगले | बागायत : मालवण बेळणे मुख्य रस्त्यावर बागायत येथे विठ्ठलादेवी पुलानजीक समोरून येणाऱ्या एस टी बसला बाजू देण्यासाठी रस्त्याच्या साईड पट्टीवर चालकाने डंपर घेतला असता डंपरचे पुढचे चाक रुतले आणि डंपर जागीच थबकला. महावितरण कंपनीने जमिनीखालून टाकण्यात आलेल्या केबल साठी खणलेला चर योग्य पद्धतीने बुजबिला नसल्याने हा प्रकार घडल्याचे बोलले जात होते. खरे पाहता डंपर रिकामी असल्याने तो जागीच उभा राहिला मात्र भरलेल्या अवस्थेत असता तर तो गटारात कलंडून मोठा अनर्थ घडला असता.
सहा महिन्यापूर्वी विठ्ठलादेवी पूल ते बागायत बाजारपेठ अशी जाणारी विद्युत वाहिनी जमिनीखालून टाकण्यासाठी खाजगी ठेकेदार नेमून महावितरणने रस्त्याच्या साईड पट्टीवरून चर खोदला होता मात्र तत्काळ ग्रामस्थानी सदर काम थांबवून सा. बा.विभाग यांच्या निदर्शनास आणून दिले होते तसेच पुढील संभाव्य धोक्याची पूर्व कल्पना दिली होती मात्र त्याची दखल घेतली न गेल्याने हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे .यापूर्वीही असाच प्रकार आंगणेवाडी जत्रेच्या दरम्याने त्याच ठिकाणी घडल्याचे स्थानिकांनी सांगितले. जीवघेणा प्रकार घडण्यापूर्वी संबंधित विभागाने लक्ष घालून कायमस्वरूपी उपाययोजना करून साईड पट्टी पूर्ववत करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

बागायत येथे रस्त्याच्या साईड पट्टीत डंपर रुतला
