वीज खांब कोसळला
स्थानिक देवस्थानचेही नुकसान
सुदैवाने ग्रामस्थ बचावले
भाऊ भोगले | बागायत : बुधवारी सकाळी आठ च्या सुमारास पोईप जि. प. शाळे समोर वाळूने भरलेला डंपर विरुद्ध दिशेला रस्ता सोडून खाली उतरून विजेच्या खांबाला धडकून बाजूलाच असलेल्या स्थानिक देवस्थानाला धडकला. दैव बलत्तर म्हणून स्थानिक एक मोटार सायकल स्वार बचावला तसेच विजेच्या तारा तुटल्या त्यातही काही व्यक्ती बचावल्या. धडक एवढी मोठी होती की महावितरणचा लोखंडी खांब पूर्ण वाकून जमीनदोस्त झाला. तर बाजूलाच असलेल्या देवस्थानचे छप्पर पूर्ण कोसळले आहे.
मसुरे येथून वाळू घेऊन निघालेला डंपर पोईप येथून राठिवडे च्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या डंपरच्या मागच्या बाजूस धडकला आणि यातच चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि रस्त्याचा उजव्या बाजूला डंपर रस्ता सोडून खाली उतरला, यावेळी डंपर एवढ्या वेगात खाली उतरला की त्यात महावितरणचा लोखंडी खांब पूर्ण गोलाकार होऊन जमीनदोस्त झाला आणि सर्व विद्युत वाहिन्या तुटून पडल्या, डंपर पुढे जाऊन येथील असलेल्या स्थानिक देवस्थानाला जाऊन धडकला यावेळी देवस्थानचे छप्पर कोसळले. पावसामुळे जमीन मऊ झालेली असल्याने डंपरची मागची चाके रुतून राहिली म्हणून डंपर तेथेच थांबला अन्यथा तो अजून पुढे जाऊन बाजुला असलेल्या घरात घुसला असता.
बुधवारी विरण येथे आठवडा बाजार असल्याने आजूबाजूच्या दशक्रोशीतील लोकांची ये जा याच रस्त्याने असल्याने त्यावेळेस कोणीही तेवढ्या वेळेस समोर न आल्याने मोठा अनर्थ टाळला. किंवा कोणतेही वाहन समोरून न आल्याने फार मोठा धोका टळला मात्र याच वेळेस समोरून येणाऱ्या डंपरच्या मागे एक स्थानिक मोटार सायकल स्वार होता तो सुदैवाने बचावला तर महावितरणच्या तारा तुटल्या. त्यांच्या संपर्कात कोणीही न आल्याने विजेच्या धक्यापासून बचाव झाला.
घटनास्थळी तात्काळ मसुरे पोलिसांनी धाव घेऊन येतील परिस्थितीवर नियंत्रण आणत देवस्थानच्या झालेल्या नुकसानीची रक्कम तात्काळ देण्यात आली तसेच महावितरण चा झालेला खर्च देऊन तात्काळ वीजवाहिन्या पूर्ववत करून देण्यास भाग पाडले.
यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी तसेच प्रवाशांनी डंपर चालकांच्या या बेजबाबदार वृत्तीवर मोठा संताप व्यक्त केला कारण गेल्या आठ ते दहा दिवसात हिवाळे ते पोईप या भागात सात ते आठ डंपर अपघातग्रस्त झाल्याचे समजते. नेहमीच हे डंपर भरधाव वेगाने जात असल्याने स्थानिक तसेच छोट्या वाहन चालकांना त्यांचा त्रास होत असल्याचा रोष यावेळी सर्वांकडूनच बोलून दाखवण्यात आला. यावर तात्काळ उपाय न केल्यास परिणामी अशा वाहनांना बंदी आणावी लागेल असा सूर उमटू लागला.

