सिंधुदुर्ग ग्राहक मंचाचा महत्त्वपूर्ण निर्णय
आदित्य बटावले | कुडाळ : कुडाळ शहरातील तुषार विजय वालावलकर हे एचडीएफसी बँक शाखा कुडाळ यांचे ग्राहक होते. असे असताना त्यांचे खात्यामधून एकंदरीत रक्कम रुपये 1,34,998/- एवढी रक्कम अज्ञात इसमाने तक्रारदारच्या परवानगीशिवाय ऑनलाइन पद्धतीने तक्रारदाराच्या खात्यामधून सदरील रक्कम काढली होती. सदरील कामात तक्रारदार याला अचानक ऑनलाईन मेसेज आले आणि तक्रारदाराच्या खात्यामधून वरील रक्कम बजावत झाली सदरील घटना ही दिनांक 23/ 04/ 2022 ची होती त्यामुळे तक्रारदार याला एकंदरीत रक्कम रुपये 1,34,998/- एवढ्या रकमेचा आर्थिक भुरदंड झाला. वास्तविक पाहता तक्रारदार याने आपले खात्यामधून पैसे काढण्याची परवानगी कोणालाही दिली नव्हती, परंतु सदरील रक्कम शाखाधिकारी एचडीएफसी बँक कुडाळ यांच्या निष्काळजीपणाने हा भुरदंड तक्रारदार याला पडला. त्यानंतर रक्कम रुपये 25,000/- एवढी रक्कम तक्रारदार च्या खात्यात जमा झाली. परंतु रक्कम रुपये 1,14,996/- एवढी रक्कम तक्रारदाराच्या खात्यामधून अज्ञात इसमाने काढले त्यामुळे तक्रारदार याने तशा आशयाची नोटीस शाखाधिकारी एचडीएफसी बँक शाखा कुडाळ यांना दिली होती परंतु तरीसुद्धा कोणतेही दखल बँक यांनी घेतली नाही.
त्याचप्रमाणे तक्रारदार याचे सदरील आर्थिक फसवणूक लक्षात आल्यानंतर सायबर गुन्हा शाखेकडे सुद्धा लेखी तक्रार तक्रारदार यांनी दिली होती, परंतु त्याचाही काही उपयोग झाला नाही. त्यामुळे अखेरीस तक्रारदार यांनी ओरोस येथील मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांचे जवळ तक्रार दाखल केली.
त्यावेळी तक्रारदार तर्फे ॲड. संजय खानोलकर आणि ॲड . दत्ताराम राजीव बिले यांनी काम पाहिले या कामांमध्ये ऍडव्होकेट दत्ताराम राजीव बिले यांनी युक्तिवाद करून त्या युक्तिवादात विरुद्ध पक्ष एचडीएफसी बँक शाखा कुडाळ यांनी निष्काळजी पणाने सेवेत त्रुटी ठेवली, त्यामुळे तक्रारदार ग्राहक याला त्रास सहन करावा लागला हे ग्राहक मंचाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच ग्राहकांचे रकमेचे संरक्षण करणे ही जबाबदारी विरुद्ध पक्ष बँकेवर आहे हे युक्तिवादात मांडले.
सदरील युक्तिवाद ग्राहक मंचा कडून तक्रारदार याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात आली आणि आर्थिक फसवणूक झालेली रक्कम रुपये 1,14,996/- एवढी रक्कम 6% व्याजदराने विरुद्ध पक्ष यांनी तक्रारदार यास निकालापासून 45 दिवसात परत करावी असा आदेश केला तसेच रक्कम रुपये 10,000/- नुकसानी आणि रक्कम रुपये 10,000/- हा कामाचा खर्च म्हणून तक्रारदार यास द्यावा असाही आदेश श्रीमती मलूष्टे व श्री खाडिलकर यांनी केला. अशी माहिती देण्यात आली आहे. ग्राहक मंचाच्या या निर्णयामुळे ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

